साईमत जळगाव प्रतिनिधी
महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.त्याचा शुभारंभ आज पासून होणार आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली महापालिका असणार आहे.
स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही, तसेच परिक्षेची तयारी कशापध्दतीने करावी याबाबत विद्यार्थी शासंक असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला सायंकाळी ५ वाजता हे मार्गदर्शन असणार आहे.
प्रत्येक महिन्याला कोणताही वार असला तरी ५ तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे. यात राज्यातील आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी तसेच राज्या लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेले मार्गदर्शन करणार आहेत. दर वेळेस दोन अधिकारी मार्गदर्शन करतील. कोणती पुस्तके वाचावित,कसा अभ्यास करावा याचे ते मार्गदर्शन करतील.
मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ आज दि. ५ रोजी महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मनपा सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी तहसीलदार गौरी धायगुडे, जीएसटी उपायुक्त निरंजन कदम उमरेड , मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी या वर्गाला उपस्थित रहावे असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास,यापुढे छत्रपती राजे संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे हे वर्ग घेण्यात येतील.असाही मानस आहे.