‘पावर फूल’ मंत्री ना.गिरीष महाजन यांना रावेर लोकसभा निवडणूक लढवावी लागणार?

0
38

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा निवडून आणण्याचे व्हिजन भाजपने ठरविले आहे. राज्यातील कोणतीही लोकसभेची जागा सहजासहजी जाऊ द्यायची नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील राज्य सरकारमधील विद्यमान मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामनेर विधानसभेवर सतत ६ वर्ष निवडून आलेले आणि सध्याच्या राज्य सरकारमध्ये ‘पावर फूल’ असलेले ग्रामीण रोजगार मंत्री ना. गिरीष महाजन यांना रावेर लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमधून मिळाली आहे. याविषयी जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ‘राजकीय खलबते’ शिजू लागली आहेत.

रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) च्यावतीने माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे सूतोवाच आ.नाथाभाऊ यांनी खुद्द बोलून दाखविले आहे. त्यामुळे लोकसभेच्या विद्यमान खा.रक्षा खडसे यांना डावलून त्यांच्याऐवजी नाथाभाऊ यांना तुल्यबळ लढत देणारा ‘पावर फूल’ नेता म्हणून ना. गिरीष महाजन यांच्याकडे बघितले जात आहे.

तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच ‘विळ्या-भोपळ्याचे’ वैर असलेले दिग्गज नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे नेते रावेर लोकसभेच्या निमित्त एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याची चर्चा होतांना दिसून येत आहे. खरेच ना.महाजन रावेर लोकसभा निवडणूक लढविणार का? याविषयी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ही केवळ मीडियात चर्चा…!

ना.गिरीष महाजन यांना लोकसभा लढवावी लागलीच तर जामनेर विधानसभा ना.महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांना लढवावी लागणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये व जामनेर तालुक्यातील गाव खेड्यातील कट्ट्यावर चर्चिली जात आहे. याविषयी ना. गिरीष महाजन यांना पत्रकारांनी छेडले असता ही केवळ मीडियामध्येच चर्चा असल्याचे ते म्हणाले. याबाबत वरिष्ठांचा कुठलाही आदेश आला नसल्याचे ना. महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत जाण्याची जामनेरला प्रथमच मिळणार संधी

ना. महाजन यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळालीच तर त्यांच्या रुपाने जामनेर तालुक्याला लोकसभेत जाण्याची प्रथमच संधी मिळणार आहे. मात्र, यासाठी ना.महाजन यांच्यासमोर नाथाभाऊंचे कडवे आव्हान असणार आहे. याविषयी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. असे झाल्यास जळगाव जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागून असणार आहे, हेही तेवढेच खरे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here