साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्येक वार्डतील गटारी घाणीने तुडुंब भरल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. नारायणवाडी परिसरातील रेल्वेलाईन जवळील भागातील नगरपरिषद शौचालयापासून निघालेली गटार तर कधीही व्यवस्थितरित्या सफाई होत नसल्याची स्थिती आहे. त्याच भागात राहणारा यश विवेक काळे याचा सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी आकस्मित (डेंग्यूनेच) मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने उपाय योजना करण्याची मागणी उबाठा शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्वी डासांचा प्रतिबंध व्हावा म्हणून नगरपरिषदेकडून नियमितपणे फवारणी वगैरे सारखे उपाय करण्यात येत होते. मात्र, सध्या अश्ाा उपाय योजना कुठेच होतांना दिसत नाही. शहरातील काही खासगी दवाखान्यात डेंग्यू सदृश्य रूग्णांची उपचारासाठी गर्दी होतांना दिसत आहे. त्यामुळे अक्षरक्ष: जिवघेणा खेळ चालला आहे. यामुळे नगरपरिषदेने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणारे आजार थांबविण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
…अन्यथा आंदोलनाला जावे लागेल सामोरे
या भागातील सर्व गटारींची व्यवस्थित स्वच्छता करण्यात यावी, त्याचप्रमाणे डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरु करावी. अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल. यावर त्वरित उपाययोजना करून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा प्रकार थांबवावा, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते आणि नारायणवाडीचे शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी यांच्यासह चंद्रकांत नागणे, स्वप्नील जाधव, जितेंद्र जाधव, वसंत नागणे, यशवंत जाधव यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.