साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे नवजीवन मंगल कार्यालयात ‘चेतना के स्वर’ राष्ट्रीय समूहगान स्पर्धा व ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा तर पारितोषिक वितरण प्रसंगी कर्नल अभिजीत महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, आकाश भंगाळे या मान्यवरांसह क्षेत्रीय संपर्क सचिव तुषार तोतला, संस्कार विभागाच्या प्रांत उपाध्यक्ष राधिका नारखेडे, जळगाव शाखेचे अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील उपस्थित होते.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात १६ शाळा तर मोठ्या गटात २२ शाळांनी सहभाग घेतला. समूहगान स्पर्धेत १३ शाळा सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून प्रांजली रस्से, प्राजक्ता केदार, दुष्यंत जोशी, पवन झवर यांनी काम पाहिले. ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या लहान गटात प्रथम क्रमांक ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने तर द्वितीय क्रमांक ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल यांनी मिळविला. मोठ्या गटात एस.एल.चौधरी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांकाचे तर एस.एन.झवर विद्यालय, पाळधी यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
‘चेतना के स्वर’ राष्ट्रीय समूह स्पर्धेत प्रथम क्रमांक ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल तर विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय विजेतेपद मिळाले. विवेकानंद प्रतिष्ठान सेमी इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय पारितोषिक मिळविले. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या संघांना रविवारी, ८ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादरीकरणाची संधी मिळाली आहे. कार्यक्रमात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे पथसंंचालनात सहभागी झालेल्या मोक्षदा चौधरी व ऋषिकेश बारी यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. दोन्ही स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी परिश्रम घेतले.