साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीची सोमवारी शासकीय सुट्टी होती तरी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावाचे कामकाज सुरूच होते. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज हे सुरळीतपणे सुरू आहे. शासनाने कांदा शेतीमालावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे इतर बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज बंद होते. परंतु चाळीसगाव बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कामकाज सुरूच ठेवल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कपिल पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्याआग्रहाखातर आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांचे सहकार्य घेऊन बाजार समितीने कांदा लिलावाचे कामकाज सुरु ठेवलेले होते. चाळीसगाव बाजार समितीत १७६ वाहनांमधून सुमारे अडीच हजार क्विंटलपर्यंत कांदा शेतीमालाचीआवक झालेली होती. ५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत कांदा शेतीमालाला भाव पुकारला गेल्याची माहिती बाजार समितीचे सचिव जगदिश लोधे यांनी दिली. राज्यामध्ये इतर बाजार समितीचे कामकाज बंद असले तरी चाळीसगाव बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. चाळीसगाव बाजार समिती प्रशासनाने व बाजार समितीच्या संचालक मंडळाने मनाशी घेऊन बाजार समितीचे कामकाज हे पूर्ववत सुरू ठेवलेले आहे. असेच शेतकरी हिताचे निर्णय बाजार समिती घेईल, अशीही आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा पुरविणार
चाळीसगाव बाजार समिती ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन निर्णय घेऊन जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड यांच्यासह नूतन संचालक मंडळांनी दिली.
शेतकऱ्यांनी शेतीमाल हा चाळीसगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणावा व चालू बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील यांनी केले आहे.