साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथील नि.पं. पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पितांबर पाटील यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा कार्याची दखल घेऊन त्यांना धुळे येथे हा पुरस्कार देण्यात आला. नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल गणपती श्रीनिवासन, आ.कुणाल पाटील, शिवाजी अकलाडे, प्रमोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील, भास्कर पाटील होते.
उपशिक्षक राजेंद्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड, सचिव सतिषचंद्र काशिद, सहसचिव दीपक गरूड, वसतिगृहाचे सचिव कैलास देशमुख, मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.