माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा…दोन घासांच्या रंगी, ‘अवघा रंग एक झाला’!

0
21

साईमत भुसावळ प्रतिनिधी

माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा… दोन घासांच्या रंगी,‘ अवघा रंग एक कसा होतो; याची शब्दश: प्रचिती दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळात आली. निमित्त होते, गणेश विसर्जनाच्या दिवशी साईभक्त पिंटू कोठारी यांच्याकडून भाविकांसाठी आयोजित महाभंडाऱ्याचे. अक्षरश: कुणीही या आणि जेवून जा, या शब्दांची प्रचिती देणारा हा महाभंडारा यंदाही भुसावळकरांनी मर्मबंधातल्या ठेवीसारखा भक्तीपूर्ण अंत:करणात आराधनेने ओथंबून राहावा, असा जपून ठेवला आहे.

भुसावळच्या साई मंदिरांच्या विश्वस्तांपैकी एक आणि प्रथितयश व्यापारी पिंटू कोठारी यांची साईभक्ती सर्वश्रूत आहेच. माणुसकी म्हणून अगदी कुणी अनोळखी आला तरी त्याच्यासाठी आपल्या मनाचा हळवा कोपरा कायम मोकळा ठेवणारा, आहे त्या परिस्थितीत अन्‌‍‍ शक्य त्या मदतीला नेहमी उभा राहणारा हा माणूस लोकांच्या नेहमी लक्षात राहतोयं ते त्याच्या मूर्तीमंत माणुसकीच्या सद्भावनेमुळेही !
प्रचलित दुनियादारीत साईजीवन प्रोव्हीजन्स या व्यावसायिक फर्मचे मालक, ही पिंटू कोठारी यांची ओळख. धार्मिक संसस्कारांनी जागवलेली माणुसकी पिंटू कोठारी यांनी तळहातावरच्या फोडासारखी जपलीयं, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. धार्मिकता म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर प्रत्येकातले ‘माणूसपण’ कवेत घेऊन ‘सर्वांना सोबत घेऊन ‘चालण्याचाही‘ व्यापार’ करीत त्यातून ‘संचिताचा नफा’ वाढावा म्हणून धडपडणारा हा ‘भक्तीसंपन्नतेचा व्यापारी’ यंदाच्या गणेश विसर्जनाला सर्वाना दोन घास भरवण्यात आघाडीवर होता.
यंदा पुरी, दोन भाज्या, फोडणीचा भात, कढी असा मेनू असलेले जेवण त्यांनी सर्वांना दिले. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या जेवणावळी रात्री विसर्जन करून आलेल्या शेवटच्या माणसापर्यंत सुरू होत्या. गणेश मंडळांचे कार्यकर्ते त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन जमेल तसे जेवण करूनच पुढच्या कामाला निघत होते.

दुपारी जेवणाला येणाऱ्यांची गर्दी वाढत होती तरीही त्यांच्या व्यवस्थेत काहीही कमी पडत नव्हते. ५० आचारी फक्त जेवण तयार करण्यात आणि त्यांना महत म्हणून १०० अन्य सहकारी उसंत न घेता राबत होते. गणेश विसर्जनासाठीच्या गस्तीवरच्या पोलिसांसह होमगार्ड व सर्व सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची पाकीटे पिण्याच्या पाण्यासह त्यांना हव्या त्या जागी पोहचवली गेली होती. मंडपात जेवणारे जेवत होते तरीही कुठेच काही कमी पडल्याचा ‘ब्र’ शब्दही कुणाकडून ऐकायला येत नव्हता. विसर्जनाची व्यवस्था म्हणून तापीनदीकाठावर ६ ठिकाणी मंडपांसह सोय केलेली होती. तेथील न.प. कर्मचारी , पोलिस, पोहणारे पाणाडे, आरोग्य कर्मचारी आदींनाही दोनवेळचे जेवण त्यांना अपेक्षित वेळेत पिण्याच्या पाण्यासह पोहचवले गेले होते. केवळ भुसावळ शहरातीलच नव्हे तर परिसरातील गावांमधून तापीकाठावर गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेश मंडळांच्या लोकांसह त्यांचे वाहनचालकही न बोलवता हक्काचे ठिकाण म्हणून जेवण करून जात होते.

हा अनोखा अन्नयज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी क्रिश कोठारी, गजानन चव्हाण, प्रवीण घिया, गोपाल राजपूत, संदीप चौधरी, किरण मिस्तरी, भूषण काटकर, किरण तायडे, प्रमोद महाजन, गजु गुगलीया, गजानन कुटे, मंगेश चौधरी, शुभम माळी, निलेश मिस्त्री, सिधु बावसकर, भय्या ठाकूर, सागर चंडाले यांचा हातभार लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here