साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील कांग नदीच्या पात्रात आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील मुजावर मोहल्ला भागातील १९ वर्षीय अविवाहित तरुणाचा बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर असे की, शेख आदिल शेख जमील मुजावर, ताहीर शेख आसिफ आणि अफ्फान शेख हाफिज असे तिघे जण रविवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कांग नदीच्या पात्रातील शेवडीजवळ पोहण्यासाठी गेले होते. परंतू नदीला पूर आल्यामुळे पाण्यातील प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने शेख आदिल शेख जमील मुजावर (वय १९, रा.मुजावर मोहल्ला) हा पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहत गेला. तो पाण्यात वाहत गेल्याने त्याच्या सोबतचे दोन जण घाबरून गेले. त्यांनी घरी धावत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या नातेवाईकांनी दुपारपासून रात्रभर त्यांचा शोध घेतला. तेव्हा शेवटी सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शोध कार्याला यश येऊन आदिलचा मृतदेह भुसावळ रस्त्यावरील कांगनदीच्या पात्रातील नवीन पुलाच्या बांधकामाजवळ सापडला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.हे.कॉ. राजू सोनवणे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
