साईमत, मुंबई : प्रतिनिधी
‘मुंडे साहेब की जय…’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणा देत एका तरुणाने मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी चक्क मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या आवारातील असलेल्या दोरीच्या जाळीमुळे त्याचा जीव वाचला. त्याला मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ बाजूला घेऊन त्याची विचारपूस केली. मात्र, त्या तरुणाचे नाव समजू शकले नाही. ‘शिक्षक भरती लवकर करा’ अशा मागणीची घोषणा तो करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर त्या तरुणाविषयी चर्चा सुरु होती. त्याने आत्महत्येचा का प्रयत्न केला, याबाबतही कुजबुज सुरु होती. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
