साईमत, जळगाव : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात होण्याच्या दृष्टीने एसडी-सीडच्या माध्यमातून वर्षभरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा तसेच शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यातील एक महत्त्वाची कार्यशाळा म्हणजे “स्मार्ट गर्ल” कार्यशाळा. युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी तसेच त्यांना आत्मजाणीव व्हावी या उद्देशाने मानवसेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे “स्मार्ट गर्ल” (युवती सशक्तीकरण) या दोन दिवसीय मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर युवतींना मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मजाणीव, संवादचा अभाव आणि नाते संबंध, आत्मसन्मान व स्व-संरक्षण, दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत, वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव, मोबाईल व इंटरनेटचा वाढता प्रभाव तसेच निर्णय व निवड आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पालकांशी संवाद साधला.
मुलींनी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे
शिबिरात विद्यार्थिनींना विविध बोधकथांच्या माध्यमातून ‘स्व:’ ची जाणीव करून दिली. कुठल्याही विपरीत परिस्थितीत घाबरून न जाता परिस्थिती सोबत दोन हात करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मुली स्वतःच स्वत:ची मदत करू शकतात, असे त्यांनी सांगितले. आज महिलांनी चंद्रावर जाण्याला महत्व आहेच. परंतु त्या सोबतच त्यांना घरातली काम करता येणे हे सुद्धा महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर स्त्री-पुरुष समानतेचा सोईपुरता वापर न करता, आपल्या वागण्यातून स्त्री-पुरुष समानता दिसली पाहिजे. आपल्यासोबत होणाऱ्या एखाद्या वाईट घटनेला आपण कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीला महिलांसोबत होणाऱ्या वाईट घटना लक्षात घेता मुलींनी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही महाजन म्हणाले.
यांची होती उपस्थिती
कार्यशाळेला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, शिक्षिका अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ, शिक्षक गिरीश जाधव, संदीप पवार आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या व व्यवस्थापन यांच्याबद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुत्रसंचलन तथा आभार एसडी-सीड समन्वयक विरभूषण पाटील यांनी मानले.