भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहीर

0
43

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत (इटकी, ता. सांगोला, सातारा) यांना जाहीर झाला आहे. ‌‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव‌’ पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर नुकतीच पार पडली. बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष तथा साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. शोभा नाईक, ज्योती जैन हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच सदस्य ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. सुरवातीला कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली.

‘भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङ्मयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. जैन इरिगेशनचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here