एआयच्या रूपात पाचवी औद्योगिक क्रांती निशब्द करणारी

0
18

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने झालेली ही पाचवी औद्योगिक क्रांती निशब्द करणारी असल्याचे प्रतिपादन वक्ते तथा सिद्धेश इन्फोटेकचे संचालक संतोष बिरारी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या गणपती नगरातील रोटरी सभागृहात आयोजित ‘चॅट जीपीटीचा व्यवसायावर होणारा परिणाम’ विषयावरील जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर आयपीपी विपुल पारेख, मानद सचिव दिनेश थोरात उपस्थित होते.

व्याख्यानात बोलताना प्रारंभी बिरारी यांनी १७६५, १८७०, १९६९, २००० आणि २०२० मध्ये झालेल्या पाच क्रांतीची माहिती देत यंत्र व तंत्र युगाचे महत्त्व समजावून सांगितले. २०२२ मध्ये एआयची निर्मिती झाल्यानंतर हजारो ॲप्लीकेशन अस्तित्वात आले आहे. त्यापैकी चॅट जीपीटी हे एक आहे. परिपूर्ण व अधिकृत माहिती दहा ते वीस सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यासोबत बार्ड या गुगलच्या ॲपबद्दल बिरारी यांनी उदाहरणासह सविस्तर माहिती देत सभासदांना मंत्रमुग्ध केले.

पुढे बिरारी म्हणाले, नोकऱ्यांवर फार परिणाम होणार नाही. उलट नवीन संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आता केवळ एका पदवीने करिअर करणे शक्य नसून त्यासोबतच सृजनशीलता गरजेची आहे, असे सांगितले.

रोज सकाळी नवनवीन आविष्कार

व्हिडिओ डॉट एआय, बिटओव्हन डॉट एआय या ॲप्लीकेशनसह इंटिरियर डिझायनर, हेअर स्टाईल, ॲग्रीकल्चर, होम क्लिनिंग, व्हिडिओ कॅरेक्टर रिप्लेसमेंट, जनरेटिव्ह एआय, (फोटोशॉप एआय) याविषयी माहिती दिली. रोज सकाळी नवनवीन आविष्कार या क्षेत्रात येत आहे. हे भविष्यातील चित्र नसून आजचे वास्तव आहे. त्याचे वर्णन फक्त अफाट या शब्दातच करता येईल, असेही ते म्हणाले. परिचय समर्थसिंग पाटील यांनी तर आभार जितेंद्र बर्डे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here