साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांच्या मार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. या योजनेत अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलचा समावेश करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आले आहे.
शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांमार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नगर, नाशिक, आदी भागातील शाळांचा समावेश आहे. मात्र, खान्देशातील एकाही शाळेचा समावेश नाही. सानेगुरुजींसारख्या थोर स्वातंत्र्य सेनानी, आदर्श शिक्षक व महापुरुषाच्या निगडीत असलेल्या प्रताप हायस्कूल, अमळनेर, जि.जळगाव शाळेचा समावेश नसणे ही अन्यायकारक बाब आहे. म्हणून खान्देशचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रताप हायस्कूल शाळेला सांस्कृतीक व पर्यटन विभागातर्फे अर्थ सहाय्य मिळावे, अशी मागणी अमळनेर तालुका शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे.