साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्तूल आढळून आल्याने ऐन गणपती उत्सवाच्या पूर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास ताब्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला आहे.
सविस्तर असे की, गोराडखेडा गावातील गैइबन शहा अलीबाबा दर्ग्याजवळ सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली होती. ही माहिती पो. कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदीप भोई, विनोद बेलदार यांचे पथक तयार करुन घटनास्थळाकडे रवाना केले.
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयित तरुणास पिस्तूल व जिवंत काडतूससह शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी पो. कॉ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गौरव राजेंद्र पाटील (वय २६, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) याच्याविरुध्द भाग ६ गु. र. नं. ३४३ /२३ भादंवि शस्त्र अधिनियम कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. गौरव राजेंद्र पाटील याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.
पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात तरुण अडकला
गणेश उत्सवाच्या पूर्व संध्येला शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरू असतांना शहरापासून दोन कि. मी. अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्तूल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळला आहे. त्यामुळे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.