साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी, १८ रोजी आमसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा आ.मंगेश चव्हाण होते. यापूर्वी १२ वर्षांपूर्वी ५ मार्च २०११ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आलेली होती. त्यानंतर आमसभेचे आयोजन करण्यात आले. आमसभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. आमसभेला चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दिली. तसेच आमसभेचे प्रक्षेपण फेसबुक व युट्युबवर लाइव्ह केले होते. प्रक्षेपण राज्यभरात लाखो लोकांनी पाहत आजपर्यंत न बघितलेली आमसभा अनुभवली.
आमसभेची प्रस्तावना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी आमसभेची पूर्वतयारी, आमसभेचे महत्त्व तसेच चाळीसगावातील आमसभेचा इतिहास, रुपरेषा याबाबत माहिती दिली. विविध विभागांनी त्यांच्या विभागांच्या माहितीसह योजनांची व कामांची माहिती दिली. पीपीटीच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण केले. सादरीकरण झाल्यानंतर त्या विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आ.मंगेश चव्हाण यांनी ऐकून घेतल्या. तक्रारींची पूर्तता करण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश केले. आपल्या विभागातील योजना संदर्भात सविस्तर माहिती व आलेल्या तक्रारी संदर्भात स्पष्टीकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिले. आमसभेत मांडलेल्या सर्व समस्या व तक्रारी संदर्भात पुढील पंधरा दिवसात पुन्हा सर्व विभागांची बैठक घेण्यात येऊन त्याबद्दल आढावा घेतला जाणार आहे.
आमसभेला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महावितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी हडपे, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव, मेहुनबारे सहा. पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, यांच्यासह ३० हुन अधिक शासकीय विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. आमसभेसाठी ४० विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्या सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, सर्कल, मुख्याध्यापक हे शासकीय कर्मचारी उपस्थित होते. आमसभेला माजी सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल ७ तास आमसभा सुरू होती.
आमसभेत मंजूर झाले ९ ठराव…
आ.मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आमसभेत उपस्थित होत असलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने आमसभेचे ठराव पारित करण्यात येत होते. यात अभिनंदनाच्या ठरावांसह कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आले.
कामचुकार अधिकाऱ्यांना ताकीद
जिल्हा परिषदेचे ल.पा. उपअभियंता चंद्रकांत शिंपी यांच्या बाबतीत देवळीसह डोणदिगर, दहिवद येथील कामांबाबत तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत आ.मंगेश चव्हाण यांनी विषय उपस्थित केला असता संबंधित उपअभियंता शिंपी हे आमसभेला पूर्व परवानगी न घेता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत आ.चव्हाण यांनी उपअभियंता शिंपी याच्यावर हक्कभंग आणून निलंबनाची कारवाई करण्याचा तसेच तक्रारी असणाऱ्या कामांची चौकशी करण्याच्या सूचना आ.मंगेश चव्हाण यांनी केल्या.
महिला बचत गटातील विविध योजनांचा लाभ देण्यात होत असलेला गैरप्रकार, मानव विकास मिशन मधील अनागोंदी, बचत गटातील महिलांना दिला जाणारा त्रास याबाबत आमसभेत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक संदीप पाटील यांची चौकशी करून बदली किंवा निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना आ.मंगेश चव्हाण यांनी दिल्या.
वनविभागाच्या सामाजिक, प्रादेशिक व वन्यजीव या तीनही विभागामार्फत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता त्यासाठी तीन सदस्यीय समित्यांनी चौकशी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. मेहुणबारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना अवैध धंदे बंद करावेत याबाबत वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नाही त्यांची चौकशी करून निलंबनाचा अथवा बदलीच्या सूचना करण्यात आल्या.