संभाजीनगर ः
मराठवाड्यात कॅबिनेटची जी बैठक पार पडते आहे त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे असे म्हटले आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही अशीच टीका केली आहे. या सरकारकडून फक्त घोषणाबाजी सुरु आहे, मराठवाड्यातही तशाच घोषणा दिल्या जातील, ५० हजार कोटींचे पॅकेज वगैरे जाहीर केले जाईल. प्रत्यक्षात कुठलीही योजना अमलात येणार नाही असे आदित्य ठाकरेेंनी म्हटले आहे. या सगळ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
“मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती त्यातले जवळपास सगळ्या निर्णयांची अमलबजावणी झालेली आहे.त्याची माहितीही आम्ही पत्रकारांना देणार आहोत. दुसरं जे लोक आज हे म्हणत आहेत की मागच्या बैठकीत काय झालं? त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षात तु्म्ही मराठवाड्यासाठी काय केलं? तुम्ही सरकारमधे होतात. एखादा निर्णय मागे राहिला असेल तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. जे दिलं होतं त्याचाही मुडदा पाडला. यांना मराठवाड्याशी घेणंदेणं नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे, हे कावेबाज लोक आहेत.” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.