साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा अर्थात कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतीक समजला जाणारा ‘बैलपोळा’ तालुक्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झाला असला तरीही बळीराजाच्या जीवनात त्याचे स्थान आजही कायम आहे. शेतकऱ्यांच्या जोडीने शेतात राबणाऱ्या अशा सच्चा मित्राचे गोड कौतुक करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. बैल पोळ्याच्या दिवशी त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली गेली. पुरणपोळीसारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य देऊन वाजत-गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेकांनी घरीच बैलपूजा केली. यावेळी अनेक चिमुकल्यांनी बैलराजास आपल्या शेतात पूजन करुन नैवेद्य अर्पण केला.