साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथुन जवळील सार्वे, ता.पाचोरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजेंद्र पंडीत पाटील यांची ८० हजार रुपये किंमतीची गाय ठार झाली. यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी, शेतमजूरांमध्ये घबराट पसरली आहे. यासंदर्भात वन खात्यास तक्रार देताच वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे गुरुवारी, १४ रोजीच्या रात्री राजेंद्र पंडीत पाटील यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. गेल्या पंधरा दिवसांपासून सार्वे आणि पिंप्री शिवारात बिबट्या शेतकऱ्यांना नजरेस पडत आहे. यापूर्वीही बिबट्याने काही डुक्कर आणि कुत्र्यांची शिकार केली होती. १४ च्या रात्री राजेंद्र पाटील यांच्या गाईची शिकार केल्याने सार्वेसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल हर्षल मुलाणी, नांद्राचे वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक योगेश साळुंखे, सह वनमजुरांनी भेट देऊन पाहणी करत घटनेचा पंचनामा केला. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.
तीन ट्रॅप कॅमेरे बसविणार
सार्वे येथुन फोन आल्याने येऊन पाहणी केली. काही नागरिकांना बिबट्या दिसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्याप्रमाणे आजच सार्वे येथे तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यात बिबट्या दिसला तर याठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल हर्षल मुलाणी यांनी दिली.



