साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरी भागात पुरणपोळी खाऊन पोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, शेती, बैलाचे राबणे, पोळ्याला त्याची केली जाणारी सजावट याची मोबाईल युगातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्याच पार्श्वभूमीवर पोळ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी बैल सजावट साहित्याचे व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही चित्रप्रदर्शनातून बैलाची अनोखी सजावट अनुभवली. हा स्तुत्य उपक्रम उपशिक्षक जिजाबराव वाघ यांनी राबविला. उद्घाटन मुख्याध्यापिका मंजूषा नानकर यांच्या हस्ते झाले.
ग्रामीण भागातील सण-उत्सव परंपरेसोबतच शेतीची मशागत करतांना लागणारे साहित्य प्राण्याची मदत याची माहिती शहरातील विद्यार्थ्यांना नसते. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळेही सामान्यज्ञान, आजुबाजूच्या परिसराच्या माहितीचा त्यांच्यात अभाव जाणवतो. हे लक्षात घेऊनच पोळा सण व बैल सजावटीचे साहित्याचे चित्रप्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
यशस्वीतेसाठी त्रिशला निकम, अनिल महाजन, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, सचिन चव्हाण, अजयराव सोमवंशी, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दिपाली चौधरी, कविता साळुंखे, रेखा चौधरी, रंजना चौधरी, सचिन पाखले, रेश्मा स्वार, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
बैल साजश्रृंगाविषयी कुतूहल
बैल सजविण्यासाठी लागणारे झूल, गेरु, बेगड, बाशिंग, मटाट्या, घुंगरु, टाळ, टापर बेरडी, मुस्के, माथाटी यासह शेती मशागतीसाठी लागणाऱ्या वखर, लाकडी नांगर, डवरा, तिफण साहित्याचाही चित्र प्रदर्शनात समावेश होता. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सजावटीच्या प्रत्येक साहित्याची माहिती थोडक्यात सांगितली. ३५० विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले. यावेळी त्यांनी कुतूहलाने काही प्रश्नही विचारले. यावेळी देवयानी धामणे, साई वाघ, अमित चौधरी, महेश वाघ, स्वामी आगोणे, मनस्वी बिऱ्हारे या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. उपक्रमाचे शाळा समितीचे सदस्य श्यामलाल कुमावत, जितेंद्र वाणी, योगेश करंकाळ यांनी कौतुक केले.