साईमत, जामनेर : प्रतिनिधी
दोन मुले असताना तिसरीही मुलगी झाली म्हणून बापाने नवजात अभ्रक मुलीला स्वतःजवळची तंबाखू तोंडात टाकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बापावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील हरी नगर तांडा येथे ३० वर्षीय तरुण हा आपल्या पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. यापूर्वी त्याला दोन मुली झाल्या. दरम्यान, तिसरे अपत्यही मुलगीच झाल्याचा राग मनात ठेवून नवजात अभ्रक मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला झोक्यात टाकून ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे मृतदेह गावाचे शेजारी असलेल्या नाल्याजवळ खड्ड्यात पुरून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.