साईमत : जळगाव : प्रतिनिधी
जिथे फक्त प्रेम आणि प्रेम आहे तो म्हणजे स्वर्ग, आणि मनोबल म्हणजे धरती वरचा स्वर्गच आहे, जिथे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार हि सर्वात पहिले केला गेला आहे. तुमच्यातील मनोबल बघून आज आमच्या सर्वांचे मनोबल वाढले आहे. भारतातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांसाठीच्या या विशेष प्रकल्पात येणाऱ्या काळात आमिर खान यांना तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी मी नक्की घेऊन येणार अश्या भावना सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केल्या.
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पास पाणी फाऊंडेशनच्या टीमने भेट दिली त्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या प्रसंगी डॉ.अविनाश पोळ, रिना दत्ता, नॅन्सी फर्नांडिस, नन्नवरे सर, डि.एल.मोहिते, ख्रिस्तोपर रेगो, साहिल भट्टड, निखिल जोशी, सुरेश भाटिया, लिपी मेहता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चैताली पातावर हिने तर प्रास्ताविक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.
यजुर्वेंद्र महाजन प्रास्ताविकात बोलतांना असे म्हणाले कि, आपल्या सर्वांचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी पाणी फाऊंडेशन तन, मन, धनाने कार्य करीत आहे. पाणी फाऊंडेशनचे अभ्यासू आणि सातत्यपूर्ण काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्याना कायमच प्रेरणा देत आहे.
प्रत्येकाचा आनंद वेग वेगळ्या गोष्टीत असतो. पाणी फाऊंडेशन द्वारे करत असलेल्या कामातून मला मिळणाऱ्या आनंदाला समाजाची मान्यता आहे आणि त्यातुन नव निर्मिती आहे. प्रत्येकाने स्वतःची आनंदाची वाट स्वतःच शोधायची असते, फक्त तो आनंद शोधायची नजर तुमच्यात असली पाहिजे अश्या भावना डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केल्या. तुमच्या कडे बघून जगात काही अशक्य आहे असं कुणी म्हणणार नाही, जिथे प्रेम असेल तिथे सर्व काही शक्य आहे अश्या भावना रिना दत्ता यांनी व्यक्त केल्या.
दिव्यांगांसाठी कार्य करणारे आणि दोन्ही पाय नसलेले निरंजन जाधव व सातत्यपूर्ण आणि विशेष कामगिरी केल्याबद्दल दिपस्तंभ मनोबलचे सहकारी शेखर साळूंके यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. पाणी फाऊंडेशनच्या सर्व टीमने या वेळी विदयार्थ्यांसोबत प्रार्थनेत सहभागी होत प्रकल्पाची पाहणी केली.