साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
माझ्या आपत्तीच्या काळात अमळनेरकरांनी मदत केली नसती तर माझे राजकीय पुनर्वसन झाले नसते अशा भावनिक शब्दात ना.अनिल पाटील यांनी अमळनेरातील जनतेचे ऋण व्यक्त केले. अमळनेर शहरातील सर्व संस्था व समाजातर्फे नागरी सत्कार समिती स्थापन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी, १० सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. त्यांनी भावनिक होऊन सगळ्या नागरिकांचे आभार मानले. हा सत्कार सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व संघटना, सर्व विविध समाजाचे प्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी अशा सर्वांच्यावतीने मोठ्या उत्साहात झाला.
व्यासपीठावर खा.उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, सभापती अशोक पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोद पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, ॲड.ललिता पाटील, डॉ.अविनाश जोशी, श्याम अहिरे, भोजमल पाटील, मातोश्री पुष्पाबाई पाटील, जयश्री पाटील, राजश्री पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील उपस्थित होते.
सजविलेल्या बैलगाडीवरुन मिरवणूक
सुरुवातीला मंत्री अनिल पाटील यांची घरापासून सजविलेल्या बैलगाडीवर मिरवणूक काढण्यात आली. सोबत २० बैलगाड्या सजविल्या होत्या. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबी मशीनने मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अमळनेर नागरी समितीतर्फे मोठा हार व सन्मानचिन्ह देऊन ना.अनिल पाटील यांचा सत्कार केला. त्यांनतर बाजार समितीचे संचालक व डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सत्कार केला.
यांनी व्यक्त केले मनोगत
ना.अनिल पाटील यांच्यात प्रशासन हलविण्याची क्षमता आहे. खान्देशातील बॅकलॉग ते खेचून आणतील, असा विश्वास खा.उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला. अजित पवार यांचा अनिल पाटील यांच्यावर विश्वास आहे. ना. अनिल पाटील यांना विविध क्षेत्रात कार्याचा अनुभव असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले. अमळनेर तालुक्याची वज्रमूठ बांधणे आपल्या हातात आहे. सत्तेचा उपयोग करून अनिल पाटील यांनी वज्रमुठ बांधावी, अशी अपेक्षा माजी आ.स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सभापती अशोक पाटील, ॲड.ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांनी केला सत्कार
सत्कार सोहळ्यात अमळनेर तालुका मराठा समाज, मराठा समाज महिला मंडळ, खान्देश शिक्षण मंडळ, अर्बन बँक, नगरपालिका, ग्रामविकास शिक्षण मंडळ, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, विद्रोही साहित्य संमेलन समिती, जैन समाज, मुस्लिम समाज, कोळी समाज, ठाकूर समाज, लाडशाखीय वाणी समाज, अमळनेर स्मारक समिती, बडगुजर समाज, आंबेडकरी समाज, शिंपी समाज यांच्यासह विविध समाज, संस्था ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला. सूत्रसंचालन डिंगबर महाले यांनी केले.