साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वादपूर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुलीकरीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते.
यावेळी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्या.एन. के. वाळके, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्रीमती एस.आर.शिंदे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.एस.सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. एच.एल. करंदीकर, सचिव ॲड. जे.एस.सैय्यद, सहसचिव ॲड. बी.आर.पाटील, खजिनदार श्रीमती एन.एम. लोडाया, ॲड.माधुरी बी. एडके, सदस्य तसेच पॅनल मेंबर्स ॲड. कविता जाधव, ॲड. एल.एच.राठोड, पी.एल.व्ही. रमेश पोतदार, देवेश दीपक पवार, न्यायालयीन कर्मचारी डी.के. पवार, एस.पी.सोनजे, डी. टी. कुऱ्हाडे, तुषार भावसार यांच्यासह इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी लोकन्यायालयाचे कामकाज पूर्ण केले.
राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पूर्व ९ हजार १३६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९६० प्रकरणे निकाली काढण्यात येवून त्याबाबतची वसुली ५३ लाख ४६ हजार १०८ रुपये केली. त्याचप्रमाणे चाळीसगाव न्यायालयातील दाखल दिवाणी व फौजदारी प्रकरणे १ हजार १७८ पैकी ७३ निकाली काढले. त्याबाबतची १ कोटी ४३ लाख ४४ हजार ३१७ रुपये वसुली केली. अशाप्रकारे १ हजार ३३ प्रकरणे निकाली आणि वसुली १ कोटी ९६ लाख ९० हजार ४२५ रुपये केली.
३ वैवाहिक जोडप्यांचे ‘मनोमिलन’
दिवाणी प्रकरणात इस्माईल बेग वि. महेश नावरकर व इतर २१ वरिष्ठ नागरिक असलेल्या ९ वर्षापेक्षा जास्त वर्ष जुन्या प्रकरणात समेट घडवून आणला. तसेच ३ वैवाहिक जोडप्यांनी नव्याने नांदावयास सुरुवात केली. यशस्वीतेसाठी न्या. एन. के. वाळके यांनी पं.स.चे गटविकास अधिकारी, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगाव, सर्व बँक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.