फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी खड्डा खोलीकरण कामाचा नुकताच शुभारंभ केला. मागील दोन वर्षांमध्ये झाडी नदीपात्रात केलेल्या खड्ड्यामुळे परिसरातील शेतकर्यांना याचा फायदा झाला हा खड्डा तीन वेळा पूर्ण भरून पाण्याचा जमिनीतील निचरा झाला.
परिसराचे प्रांत कैलास कडलक तसेच या विभागाचे सर्कल जे.डी. बंगाळे यांच्या पूर्वपरवानगीने यावर्षी सुद्धा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पाणी शुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे तसेच स्मशाभूमी मागे धाडी नदीपात्रात खड्डा खोदण्यास शुभारंभ केला. परिसरातील शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन ना नफा ना तोटा या तत्त्वाने धाडी नदीपात्रातील माती आपल्या शेतात किंवा भराव टाकण्यास घेऊन जावी. यासाठी आपले स्वतःचे ट्रॅक्टर किंवा भाडे तत्त्वाने ट्रॅक्टर आणून जेसीबी धारकाला ठरलेली मजुरी देऊन माती वाहून नेण्याचे आवाहन महाराजांनी केली आहे. खड्डा करतेवेळी आजूबाजूच्या शेतकर्यांचे किंवा त्यांच्या शेतातील बांधाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसे आढळून आल्यास किंवा कोणाची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे ही त्यांनी सूचित केले आहे. खड्डा खोलीकरण करणे किंवा हे काम बंद करण्याचे अधिकार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना देण्यात आले आहे.