‘नगर‌’ पालिका की ‌‘नरक‌’ पालिका

0
31

जळगावकरांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय्‌‍‍ ‌‘राम जाने‌’. जळगाव महानगरपालिकेची पाच वर्षाची मुदत येत्या १७ सप्टेबर रोजी संपत आहे.त्यानंतर मनपावर प्रशासक राजवट सुरु होईल.ती निवडणुका होऊन नव्या महापौरांची निवड होईपर्यंत राहील.गेल्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जळगावकरांनी भाजपाच्या पारड्यात मतदानाचे भरघोस दान टाकले.७५ पैकी ५७ जागा दिल्या व एकहाती सत्ता प्रदान केली. त्यामागचे एक मुख्य कारण होते ते म्हणजे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी शहरवासियांना दिलेला शब्द.ते म्हणाले होते की,भाजपाला सत्ता दिल्यास जळगावचा चेहरामोहरा एक वर्षात बदलून टाकू.भाबड्या मतदारांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला.काही नाहीतर कमीत कमी शहरातील रस्ते,गटारी व आरोग्याच्या समस्या तरी मार्गी लागतील एवढीच माफक अपेक्षा लोकांनी केली मात्र झाले उलटेच. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर पार्कवरील सभेत जळगावच्या विकासासाठी १०० कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आणि नागरिकांना हायसे वाटले.आता रस्ते,गटारी,आरोग्याच्या कामांना वेग मिळेल,असे वाटले पण हा घोषित निधी प्रत्यक्षात काही लवकर आला नाही त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या मनपाचे प्रशासन बघ्याची भूमिका घेण्याशिवाय काहीही करु शकले नाही.भाजपाच्या हाती सत्ता आली व योगायोगाने भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा बहुमान मिळाला तो आमदार राजूमामा भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना.त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होणे स्वाभाविक होते.त्यांच्या सव्वा-दिड वर्षाच्या कारकिर्दीत या अपेक्षांचा भंग झाल्याने नागरिक काहीसे नाराज झाले.

त्यानंतर महापौरपदी भाजपाच्या भारती कैलास सोनवणे यांना संधी मिळाली.त्यांच्या कारकिर्दीतदेखील शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागू शकली नाही त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचे प्रमाण इतके वाढले की,वाहनधारकांना तर जाऊ द्या,पायी चालणाऱ्यांनाही मार्गक्रमण करणे कठीण होऊ लागले.कोणाचा हात तुटू लागला,कोणाचा पाय तुटू लागला,तर कोणाची कंबर तुटू लागली.काहींना तर मृत्यूला कवटाळावे लागले.हे सारे घडत असतांना जळगावच्या विकासासाठी केवळ निधींची घोषणा होत होती,प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरास होत होता.जळगाव महानगरपालिका हद्दीत विकास कामांचे तर सोडा साध्या रस्त्यांचे,गटारींची कामे होत नव्हती.शहरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती तर विस्तारीत भागातील रस्ते पावसाळ्यात खड्ड्यांंसह चिखलात आणि पाण्याच्या डबक्यांमध्ये गायब झाले होते.वाहने फसत होती.त्या-त्या भागातील नागरिकांना आपल्या घरापर्यंत पोहचण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असे.

सीमा भोळे व भारती सोनवणे यांनी आपआपल्या कारकिर्दीत मोठ्या उत्साहात ‌‘महापौर आपल्या दारी‌’ ही मोहिम राबवली.शहरातील प्रत्येक प्रभागात दौरा करुन नागरिकांच्या समस्या व प्रश्न समजावून घेण्याचा चांगला उपक्रम राबवला.मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला निधी लवकरात लवकर येईल व त्यातून हे प्रश्न मार्गी लावता येतील, अशी त्यांचीही धारणा होती.म्हणून त्यांनी मोठ्या जोशात हे जनसंपर्क अभियान राबवले परंतु प्रत्यक्षात निधी न आल्याने त्याचाही फुसका बार झाल्याचे चित्र समोर आले.

अडीच वर्षानंतर शहराच्या राजकीय पटलावर जे घडले ते सर्वांना धक्का देणारे होते.शिवसेनेला निवडणुकीत केवळ १५ जागा मिळाल्या असतांना,मनपात राजकीय भूकंप झाला.भाजपाच्या नगरसेवकांमध्ये उभी फुट पडली आणि विरोधीपक्ष नेते डॉ.सुनिल महाजन यांच्या पत्नी,शिवसेनेच्या जयश्री महाजन बहुमताने महापौरपदी आरुढ झाल्या.त्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले.जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील जिल्हा पालकमंत्री झाले.त्यांनी जळगावसाठी काही निधीही दिला.सारं काही पूरक घडत गेले त्यामुळे पहिल्या अडीच वर्षात नाराज झालेले नागरिक काहीसे सुखावले व आता तरी शहरातील रस्त्यांची कामे होऊन शहर खड्डेमुक्त होईल,अशी आशा पुन्हा निर्माण झाली.

जयश्री महाजन यांनीही मोठ्या उत्साहात शहरातील विविध प्रभागात दौरा करुन नागरिकांशी सुसंवाद साधत समस्या समजावून घेतल्या मात्र प्रत्यक्षात त्या किती सुटल्या,हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.त्यांच्या कारकिर्दीत काही कामांना चालना मिळाली.आता शेवटच्या ट्‌‍प्प्यात रस्त्यांची काही कामेही सुरु झाली.आता खड्डेमुक्त शहर होईल,असे वाटत असतांनाच राज्यात पुन्हा सत्तापालट झाला.त्यानंतर जळगाव मनपातील नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाली.कोणाचा मागमूस कोणात नाही,असे चित्र दिसू लागले.काही भाजपात परत फिरले तर काही शिवसेना शिंदे गटात सामील झाले.कोण नगरसेवक कोणत्या पक्षात किंवा गटात आहे,हे त्या-त्या भागातील जनतेलाही ठामपणे सांगता येणे शक्य नाही,हे सत्य आहे.कदाचित जळगाव शहराच्या विकासाला कोणाची नाट लागली असावी,असे वाटू लागले.आपसातील राजकीय डावपेचात रस्त्यांची कामे रखडली.त्यात पावसाळा सुरु झाला आणि जी रस्त्यांची कामे सुरु झाली होती ती थंडावली.आता पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरु होतील आणि दिवाळीपर्यंत शहरातील बहुसंख्य प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा आत्मविश्वास महापौर जयश्री महाजन यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.याशिवाय पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी स्मारक व मनपा प्रांगणातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरच होत आहे.याशिवाय जयश्री महाजन यांच्या कारकिर्दीत शहरातील काही नागरी समस्यांही मार्गी लागल्याचे दिसत आहे.प्रमुख भागात स्वच्छतागृहे सुरु झाली आहेत.असे असले तरी जळगावकरांची पूर्णपणे अपेक्षापूर्ती होऊ शकलेली नाही,हे त्यादेखील मान्य करतील.

जळगावला महानगरपालिका असली,तिची वास्तू १७ मजली असली तरी, तिची अवस्था नगरपालिका,नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीपेक्षाही खराब आहे की काय,असे काहीवेळा वाटू लागते.कारण अलिकडच्या काळात ग्रामीण भागात काँक्रिटीकरण झाले मात्र जळगावातील रस्त्यांमधील खड्डे …जैसे थे…राहिले,नव्हे त्यांची खोली व नागरिकांची डोकेदुखी वाढत गेली.मनसे असो की राष्ट्रवादीसह सामाजिक संघटनांनी रस्त्यांच्या समस्यांवर अनेकवेळा गांधीगिरीआंदोलने छेडली. पण काहीही झाले नाही.सत्ताधाऱ्यांनी अमृत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली वेळ मारुन नेण्यात धन्यता मानली. पाच वर्षात एक झाले की,जळगाव मनपा कर्जमुक्त झाली.त्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा आ.राजूमामा भोळे हे करीत आहे.त्यांनी शहरातील विविध भागात आमदार निधीतून बरीच विकासकामे केल्याचेही दिसत आहे त्यात रस्ते,गटारी,मिनी हायमास्ट लाईट,काही खुल्या जागांचा विकास,या कामांचा समावेश आहे. त्यांनी पहिल्या विधानसभा निवडणुकीतच खड्डेमुक्त जळगावचे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यादिशेने प्रयत्नही केले पण त्यांना त्यात अपेक्षित यश मिळू शकले नाही,अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

दरम्यान आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची नियुक्ती झाली.त्यांनी मनपा प्रशासनाला शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्न केला.एवढेच नव्हेतर शहरातील वाढत्या अतिक्रमणाला लगाम लावण्यासाठी पाऊले उचललीत.याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा होतील ,याची खबरदारी घेतली.ठेकेदारांची थकीत बिले टप्प्याटप्प्याने देण्यासाठीचे नियोजन केले. त्यामुळे मनपाची गेलेली पत पुन्हा निर्माण झाली.शहरातील जनतेशी निगडीत काही प्रमुख कामे मार्गी लागत असल्याचे चित्र दिसू लागले.मध्यंतरी त्यांचेही अचानक बदलीनाट्य रंगल्याने त्यांच्या कामांनाही अडसर निर्माण झाला.

एकंदरीत जळगाव महानगरपालिका गेल्या पाच वर्षात कर्जमुक्त झाली एवढेच समाधान मानावे लागेल परंतु शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही,हेदेखील तितकेच सत्य आहे,ते नाकारुन चालणार नाही.ना.गिरीष महाजन यांच्या गेल्या निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनाची जळगावकर आज खिल्ली उडवत आहे. दबक्या आवाजात ते म्हणतात की,जळगावचा चेहरामोहरा एक वर्षात बदलवणार होते.त्यांनी, रस्त्यात जे खड्डे होते,त्याचे प्रमाण वाढवून आणि आणखी खोल करुन,त्यांनी जळगावचा चेहरा आणखी विद्रुप केला म्हणजेच चेहरामोहरा बदलवून दिलेले आश्वासन पूर्ण केले.गेल्या पाच वर्षात जळगावकरांनी काय कमावलंं आणि काय गमावलं,याचा हिशोब केला तर ,जळगावकरांनी रस्त्यातील खड्डे कमावले आणि त्यात अनेक जळगावकरांचे जीव गमावले,हे कबूल करावे लागेल.रस्त्यातील प्रचंड मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ज्या यातना नागरिकांनी भोग्ाल्या त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतील.त्या यातनांना नरकयातना म्हणाव्या लागलीत.म्हणजेच जळगावकरांना गेल्या पाचवर्षातील मनपा कारभाराचा वाईट अनभव आला. गेल्या पाचवर्षात सत्तेवर कोणीही असो,जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी असणे स्वाभाविक आहे.विकास कामे तर सोडा,साधी नागरी सुविधांची कामे होऊ शकली नाही.रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तर नागरिक हैराण झाले.त्या त्रागामुळे जळगावकरांनी ‌‘नगर‌’पालिकेला ‌‘नरक‌’ पालिका म्हटले तर त्यात वावगे ठरु नये.

हेमंत काळुंखे, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
मो.९८८१७ ५४५४३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here