साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या पटांगणात सुंदर रांगोळी व आकर्षक दहीहंडी सजविण्यात आली होती. जन्माष्टमी उत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व गोपिका यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. शाळेच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरूवात झाली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक पेहराव करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
“हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की” च्या गजरात विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांनी दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. संपूर्ण शाळेचा परिसर आनंदाने दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, चालक वर्गाने परिश्रम घेतले.