साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
ग्रामीण भागात जुन्या रुढी, परंपरा कटाक्षाने पाळल्या जातात. अशीच एक जुनी परंपरा कजगावकर ग्रामस्थ अडीचशे वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. येथे अंदाजे अडीचशे वर्षापूर्वी भाईकनशा फकीर बाबाने घालुन दिलेली ‘कुवारी’ पंगतीची प्रथा कजगावकर आजही मोठ्या श्रद्धेने चालत आहेत. श्रावण महिन्यात गुरुवारी ‘कुवारी’ पंगतीचे आयोजन करण्यात येते. याप्रमाणे गुरुवारी, ७ रोजी पंगतीचे आयोजन केले होते. शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर वरुणराजा बरसला आहे.
भाईकनशा फकीर बाबाच्या समाधी स्थळी (दर्गा) सर्व ग्रामस्थ जमल्यानंतर याठिकाणी दर्ग्यावर चादर चढवून व फुल अर्पण केल्यानंतर मंत्र पठण केले. विधी पार केल्यानंतर बाबांच्या वास्तव्यस्थळी पूजन करून अकरा मुलांना विधीवत गोड भाताची पंगत दिली. संपूर्ण गावातील ‘कुवारी’ बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. ‘कुवारी’ पंगतीचा कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळातच वरुणराजा जोरदार बरसला. त्यामुळे संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा झाला. दुष्काळी परिस्थिती बदलली सर्वत्र शिवार फुलले. सर्व ग्रामस्थ बाबाच्या बुरुजजवळ जमले. बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हापासून ग्रामस्थांनी ‘कुवारी’ पंगतीची प्रथा कायम सुरू ठेवली आहे. दमदार पाऊस झाला तरी किंवा पावसाने दडी मारली तरी कुवारी पंगतीचे दरवर्षी आयोजन केले जाते. संपूर्ण ग्रामस्थ त्यात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात. त्यात सर्व धर्माचे सदस्यही सहभागी होतात.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी अनिल महाजन, उपसरपंच हाजी शफी मन्यार, पुंडलिक सोनवणे, अरुण राजपूत, राजेंद्र राजपूत, एकनाथ पाटील, अशोक पाटील, नारायण पाटील, रवींद्र पाटील, मन्सूर तांबोळी, राजेंद्र चौधरी, ध्रुवसिंग पाटील, सचिन पाटील, शिवाजी चौधरी, बाळासाहेब राजपूत, चिंतामण साठे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.