गाझियाबाद :
मुलाला पाण्याची भिती वाटू लागली, अचानक वागण्यात बदल होऊ लागला. मध्येच बोलताना भुंकू लागला हा सगळा प्रकार पाहून धास्तावलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचार सुरू करण्यापूर्वीच १४ वर्षांच्या मुलाने बापाच्या कुशीत जीव सोडला.
उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये १४ वर्षांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा चावला. जखम खोल नसल्याने त्याने घरी कोणालाही न सांगता त्यावर स्वतःच उपचार घेतले. आई-बाबा ओरडतील या भीतीने त्याने त्या जखमेवर मलम लावून. जवळपास एक महिन्यांपूर्वी त्याला कुत्रा चावला होता. पण वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात रेबिजचा संसर्ग पसरला. त्यानंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. शाहवेज असे या मुलाचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूने घरात व परिसरात शोककळा पसरली आहे.
शाहवेजचे वडील याकुब यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दीड महिन्यांपूर्वी त्याला कुत्रा चावला होता. मात्र, त्याने घरी कोणालाच याबाबत सांगितले नाही.त्यानंतर त्याच्या वागण्यात हळहळू बदल होत गेला. १ सप्टेंबर रोजी त्याला पाण्याची भीती वाटायला लागली. त्याच्या वागण्यात बदल झाला. इतकेच काय तर बोलत असताना तो अचानक भुंकू लागला. हा सगळा प्रकार पाहून आम्ही त्याला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी सांगितले की, हे रेबीजचे लक्षणे आहेत.
डॉक्टरांनी आम्हाला दिल्लीतील मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शाहवेजला घेऊन त्याचे पालक दिल्लीतील एम्सससह अनेक मोठ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रेबीजचा संसर्ग त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला होता. त्यावर उपचार होणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णालयांनी त्यांना परत पाठवले.
वेदनेने तडपणाऱ्या शाहवेजचा अखेर मंगळवारी रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे. बापाच्या कुशीतच पोटच्या लेकाचा मृत्यू झाल्याने तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी शेजारी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, पोलिसांनीही महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पुढील कारवाई करण्यात येत आहे.