साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील २०० अंगणवाड्या इमारती विना आहेत. बहुतांश अंगणवाडी या झोपडीत भरविल्या जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने ते रोखण्यासाठी महिला बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना आणि मातांना विविध सुविधा पुरविल्या जात असतात. मात्र, धडगाव तालुक्यात २०० अंगणवाडींना इमारती नसल्याने झोपडीत त्या भरत आहे तर दुसरीकडे गरोदर माता आणि बालकांच्या वजन करण्यासाठी काटाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये आहे. कुपोषण आणि माता मृत्यू सोबत दोन हात करण्यासाठी राज्याचा महिला बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीच्या साह्याने बालकांना विविध पोषण आहार आणि गर्भवती मातांना ही पोषण हार दिला जातो. त्याचप्रमाणे या मातांचे आरोग्य तपासणी अंगणवाडीत होत असते. मात्र, अनेक आंगणवाडी गर्भवती मातांच्या वजन करण्यासाठी काटे नाहीत तर एकट्या खुंटामुडी प्रकल्पात ६९ अंगणवाडी केंद्रांना इमारती नसल्याने ते अंगणवाडी सेविकेच्या घरात किंवा एखाद्या झोपडीत भरत आहेत. धडगाव तालुक्यातील जवळपास २०० अंगणवाडींना इमारती नसल्याचे चित्र आहे.
‘आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं’ अशीच स्थिती
एकीकडे सरकार अंगणवाडी डिजिटल विविध योजनांचा भार अंगणवाड्यांवर देत असली तरी अंगणवाड्यांना इमारती कधी उपलब्ध करून देईल, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे. कोट्यावधी रुपयांचा योजना राबविणाऱ्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने बालकांच्या सुदृढ पोषणासाठी पैसे खर्च केले जातात. मात्र, अद्ययावत अशा इमारती उभ्या केल्या जात नसल्याचे वास्तव असल्याने महिला बालकल्याण विभागाची गत ‘आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं’ अशीच परिस्थिती झाली आहे.