साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे संस्कृत दिनानिमित्त २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान संस्कृत सप्ताह राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी, हाच उद्देश सप्ताहाचा आहे. या सप्ताहातंर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात समूह नृत्य स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
फुलांचे रोप देऊन परीक्षकांचे स्वागत
स्पर्धेचे परीक्षक म्हणून नंदिनीबाई मुलींचे विद्यालय येथील सीमा भारंबे, संस्कृत शिक्षिका व शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुनिता पाटील यांनी काम पाहिले. शाळेतील उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम यांनी फुलांचे रोप देऊन परीक्षकांचे स्वागत केले. सीमा भारंबे यांनी संस्कृत विषयाचे महत्त्व फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहे, असे आपल्या भाषणातून पटवून दिले. सप्ताहासाठी मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर तसेच ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड यांचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका अलका गोविंद पितृभक्त यांचे मार्गदर्शन लाभले. प्रिया सफळे यांनी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार रूपाली कोठावदे यांनी मानले.



