साईमत, तळोदा : प्रतिनिधी
दलेलपूर शिवारातील हलालपूर रस्त्यावरील राजाराम रामराजे यांच्या शेतात दलेलपूर येथील किशोर धानका व जानेश धानका आपल्या शेळ्या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारात बिबट्याची दहशत कायम असल्याने दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. किशोर धानका व जानेश धानका यांच्या दोन शेळ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्या. पंधरा दिवसात हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे. वनविभाग नावापुरतेच उरले असल्याची ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वनविभाग मृत्यूतांडव घडवून आणत आहे. अशावेळी सर्व स्तरातून बिबटे जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. वनविभाग कधी जागा होईल आणि आमचे जीव, जनावरांचे प्राण कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न पंचक्रोशितील शेतकरी बांधव, शेतमजुर, पशुपालकांनी उपस्थित केला आहे. बिबट्या कधी पशु तर कधी मानवावर हल्ला शिवारात करत आहे. त्यामुळे परिसरात कमालीची भीती पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातून होत आहे.