साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या २ वर्षांपासून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ८ रिक्त पदांच्या बाबतीत माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील, विद्यमान सरपंच प्रमोद वसंतराव चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अनिल नाना पाटील, रावण पांडुरंग वाघ यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले होते. त्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. यामुळे आता रुग्णालयात रुग्ण तपासणीसह इतर सर्वच कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
याबद्दल रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी दोघेही महिला डॉ.भगिनींचे स्वागत केले. तसेच समस्त रांजणगावकरांच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.
