साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
पाचोरा येथील लीलावती हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे संचालक डॉ. वैभव सूर्यवंशी हे उत्कृष्ट आरोग्यसेवा, समाजसेवा करीत असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पाचोरा येथे राज्याचे मदत तथा पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, आ. किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
डॉ.वैभव सूर्यवंशी हे रात्री-अपरात्री रुग्णसेवेसाठी धावून जातात. वेळेवर रुग्णाला रक्तपुरवठा लागत असल्यास स्वतः आपले रक्त देऊन त्याठिकाणी रुग्णाला वाचविण्याचे कार्य करीत असतात. आपत्कालीन परिस्थितीत हजारो रुग्णांचे प्राण त्यांनी वाचविले आहे. त्याचबरोबर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून सामाजिक उपक्रमातही ते नेहमी सहभाग घेत असतात. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना मराठी पत्रकार संघाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
