साईमत जळगाव प्रतिनिधी
दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना बँकेचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ‘गुरुजी तु मला आवडला’ हे पुस्तक असा संच प्रत्येक विद्यार्थ्यास भेट देण्यात आला. 168 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, बँके तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी सर्व विद्यार्थी आतुर असतात, कारण त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाला व मेहनतीला कौतुकाची थाप मिळते. बँक गेल्या जवळपास 30 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करत आहे. बँकेचे असे काही सभासद आहेत की, त्यांनी स्वतः, मग त्यांच्या मुलांनी आणि आता नातवंडांनी गुणवंत सोहळ्यात बक्षिस मिळवले आहे. अशी परंपरा बँकेने जोपासली आहे. तसेच अभ्यासासोबतच खेळ, कला जोपासणे, आवड जपणे या गोष्टीही मुलांसाठी महत्वाचे आहे. म्हणून बँक यावर्षी नेहमीच्या अभ्यासक्रमांसोबतच खेळामध्ये किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या काही विद्यार्थ्यानाही गौरविण्यात येईल.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, जळगाव पीपल्स बँकेमध्ये अकोला मर्चंट कोऑप बँक विलीना झाल्या बाबत बँकेचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याचा क्रेडीट डिपॉझीट रेशो चांगला आहे. टर्म लोन, सोने तारण कर्ज याबाबत भरपूर संधी उपलब्ध आहेत. जळगाव जिल्हा केळी उत्पादन, सोने व्यवसाय, प्लास्टीक, पाईप उद्योग या सर्व अंगांनी समृद्ध आहे. एखादी बँक त्या-त्या शहराचा जिल्हयाचा विकास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे, याची आपल्याला जाणीव असावी. जळगाव पीपल्स बँकेने आपल्या जिल्ह्याचे नाव आणखी मोठे करावे. अभ्यासु मुलांनी खेळायलाही हवे आणि खेळाडु मुलांनी अभ्यास करावा असे सांगितले.
बँकेचे चेअरमन-व्यवस्थापन मंडळ व संचालक भालचंद्र पाटील यांनी मनोगतात सांगितले की, बँक दरवर्षी हा सोहळा आयेजित करते. बँकेकरीता सर्व सभासद समानरीत्या महत्वाचे आहेत, यात कोणताही दुजाभाव नाही. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना गौरिवण्या साठी हा कार्यक्रम घेण्यात येतो.सर्व पालक मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट करतात, मुलांना खुप स्पर्धेला तोंड द्यावे लागते. मात्र मुलांशी बोलून उपलब्ध संधीबात संवाद साधून करीअर बाबतचे निर्णय मुलांना स्वतःला घेऊ द्यावा, त्यांच्या वर कसलाही दबाव येऊ देऊ नका, असे सांगितले.
बँकेचे अधिकारी महेश पाटील, अनिता वाघ यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-व्यवस्थापन मंडळ व संचालक भालचंद्र पाटील, संचालक डॉ.विलास बोरोले, स्मिता पाटील, ज्ञानेश्वर मोराणकर, प्रविण खडके, बीओएम सदस्य भुषण चौधरी तसेच बँकेचे अधिकारी वर्ग तसेच विद्यार्थी आणि पालक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.