प्रतापगड ः
राजस्थानातल्या प्रतापगड जिल्ह्यातल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावात एका आदिवासी विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. २१ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीकडून आणि सासरच्यांकडून विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली.ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहात होती.त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात आले.तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करुन तिला विवस्त्र केले आणि त्यानंतर तिची धिंड काढली.
या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीट केले आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी असे म्हटले आहे की, प्रतापगढ जिल्ह्यात जी घटना घडली ती कौटुंबिक वादातून झाली. एका २१ वर्षीय विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. या प्रकरणातला तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचे अपराध करणाऱ्यांना सभ्य समाजात स्थान नाही. या गुन्हेगारांची जागा गजांच्या आडच आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवला जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने निर्णय घेऊन शिक्षा सुनावली जाईल असे ट्वीट अशोक गेहलोत यांनी केले आहे.
या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम तयार केल्या आहेत. पोलीस अधीक्षक अमित कुमार हेदेखील त्याच गावात गेले आहेत जिथे ही घटना घडली.
