साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तापी नदीकाठी पुरातन व जागृत श्री नाटेश्वर महादेवाचे मंदिर पाडळसरे येथे होणाऱ्या धरणामुळे पाण्यात बुडवून जाणार असल्याने पुनर्वसित गावात प्रति नाटेश्वर शिवलिंग स्थापना करण्याची संकल्पना महिलांनी मांडली आणि युवा वर्गाने श्रावणमासानिमित्त प्रति नाटेश्वर महादेवाचे मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन केले होते. ओंकारेश्वर येथून शिवलिंग, पितळी त्रिशूल, नंदी मूर्ती, कासव, नागदेवता आणून श्रीक्षेत्र पाडळसरे गावी सजविलेल्या ट्रॅक्टवर पारंपरिक वाद्य, डीजेच्या मदतीने सवाद्य मिरवणूक तापीनदीच्या काठावरील पुरातन मंदिरापासून मूर्त्यांना तापीस्नान घालून कुमारिका बालिकांच्या पारंपरिक पोशाखात कलश डोक्यावर घेऊन मूर्त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. श्रावण सोमवारी सुरू झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा, पौर्णिमेला महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली. त्यात शोभायात्रा, होमहवन, नवग्रह स्थापना, जलाभिषेक, धान्यधिवास, नामकरण, भजन, भारुड अशा विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे तिन्ही दिवस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पाडळसरे येथील पुनर्वसित गावी ह.भ.प. शांताराम पांडुरंग पाटील यांनी महादेवाचे शिवलिंग स्थापना करण्यासाठी स्वखुशीने जागा उपलब्ध करून दिली. त्यात महिला वर्ग व युवकांनी हातभार लावत एक महिन्यात शिवलिंगासाठी श्रमदानातून बांधकाम करून लोकसभागातून ओंकारेश्वर, उज्जैन येथून शिवलिंग, नंदी मूर्ती, कासव मूर्ती, पितळी त्रिशूल, तांब्याची गळती, पितळी घंटा आणून मोकळ्या प्रांगणात महिला भाविकांच्या स्वयं प्रेरणेने निर्माण केलेल्या मंदिरात शिवलिंगचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी सुरू झाला. पौर्णिमानिमित्त प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यावर महाप्रसादाचा भंडारा वाटप करण्यात आला.
पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक करुन प्राणप्रतिष्ठा
पहाटे पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीत कलषधारी महिला सहभागी होऊन गावभर मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सकाळी ६ वाजेपासून पारंपरिक वाद्य व सजविलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती, शिवलिंग मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ ते ७ यावेळात हरिपाठ होऊन भारुड सादरीकरण केले. रात्री ९ वाजता हरी जागर, देवीचा जागर गीतांचा कार्यक्रम आणि सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी पुनर्वसित पाडळसरे व जुन्या गावातील दोन्ही गावात एकाच घराघरातून आरती व पूजन करण्यात आले. ११ जोडप्यांनी नामयज्ञ, होमहवन केले. त्यांना निम येथील पुरोहित लक्ष्मण महाराज व लहू महाराज यांनी पौरोहित्य केले. पौर्णिमेला प्रति नाटेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंचामृत व पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
भाविकांनी केला “हरहर महादेव” चा गजर
यावेळी उपस्थित भाविकांनी “हरहर महादेव” चा गजर केला. महादेवाचे मंदिरात जलाने जलाभिषेक करून शिवलिंग स्थापना करून महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी पाडळसरे येथील शिवसरदार ग्रुप, महर्षी वाल्मिकी ग्रुप, वीर एकलव्य ग्रुपचे युवा कार्यकर्ते पाडळसरे येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळ कळमसरे, वासरे, निम, पढावद, बेटावद, भिलाली, शहापूर, खर्दे, पाडसे, तांदळी येथील भजनी मंडळांनी परिश्रम घेतले.
