साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ ते २० सप्टेंबर दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, निवडणुकीत समर्पित आयोगाच्या अहवालानुसार ओबीसीच्या जागा घटणार आहेत. जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहुरपेठ, शहापूर, सवतखेडा, कापूसवाडी, खडकी, सामरोद यांच्यासह १७ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण झालेली आहे.
गेल्या काही महिन्यापासून मुदत संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नियुक्ती केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वार्ड रचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. २५ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्याआहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १५ ते २० सप्टेंबर दरम्यान कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होता इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू झाली आहे.
पहुरला शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती
तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहुरपेठ ग्रुप ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. लोकनियुक्त सरपंच जागेसाठी अनुसूचित जमातीसाठी ही जागा राखीव आहे. १७ जागा सदस्यांसाठी असून सहा वार्ड तयार झाले आहे. सर्व वार्डात शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहे. यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय तायडे, उपसरपंच सुभाष पाटील, विनोद पाटील, विनोद ठाकूर, सुभाष खर्चाणेकर-पाटील, आमीन शेख आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहे. निवडणुकीसाठी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकतो हे येणारा काळच ठरविणार आहे.