मुंबईः राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत सुधार येत असताना आता आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची दैनंदिन संख्या ५० हजारांवर पोहचली होती. त्यामुळं आरोग्य प्रशासनावर ताण आला होता. मात्र, लॉकडाऊन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळं ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र, आता आणखी एक संकटामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. १ ते २६ मे यादरम्यान ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे या मुलांचे वय १० वर्षांपर्यंत आहे.
आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ मे रोजी लागण झालेल्या एकूण बाधित मुलांची संख्या १ लाख ३८ हजार ५७६ होती. तर, २६ मेपर्यंत तो आकडा वाढून १ लाख ७३ हजार ०६० पर्यंत पोहोचला आहे. १ मे पर्यंत राज्यात ११ ते २० वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ११ हजार ४५५ इतकी होती. व २६ मेपर्यंत याच वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ९८ हजार २६६ इतकी झाली आहे.
पहिल्या लाटेतही मुलांना करोनाची लागण
करोनाच्या पहिल्या लाटेतही लहान मुलांना करोनाची लागण झाली होती. वृद्ध व तरुणांच्या तुलनेत लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, असं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुनागडे यांनी सांगितलं आहे.
मुलांच्या जन्मानंतर लहान मुलांना विविध लसीचे डोस दिले जातात त्यामुळं लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांना घरातच खेळू द्या व बाहेरच्या पदार्थांपासून लहान मुलांना दूर ठेवल्यानं मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
शक्यतांवर चर्चा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबच करोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. यामुळं लहान मुलांनादेखील अधिक धोका असण्याचा काही संबंध येत नाही. सध्या फक्त शक्यतांवर चर्चा होत आहे, अशी माहिती वाडिया रुग्णालयाचे सीईओ डॉ. मिन्नी बोधनवाला यांनी दिली आहे.