यावल : प्रतिनिधी
कोणतीही अधिकृत पदवी नसताना यावल तालुक्यात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी यावल तहसीलदार आणि यावल गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले.
गेल्यावर्षी २१ जून २०२२ रोजी तालुक्यात बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. कार्यवाही करण्यात आली असती तर कोरपावली येथील घटना घडली नसती. विशेष म्हणजे अद्याप गेल्या दोन दिवसात कोरपावली येथील घटनेचा गुन्हा नोंद झालेला नाही. कार्यालयाअंतर्गत गुन्हा नोंद व्हावी व इतर बनावट डॉक्टरांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी यावल व तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.कुंदन फेगडे, डॉ.रमेश पाचपोळे, डॉ.अभय रावते, डॉ.गणेश रावते, डॉ.बी. के.बारी, डॉ.धिरज चौधरी, डॉ. तुषार चौधरी, डॉ.इशारार खान, डॉ.सतीश आसवार, डॉ.धिरज पाटील, डॉ.सरफराज तडवी, डॉ. अमित तडवी, डॉ.गौरव धांडे, डॉ.तुषार सोनवणे, डॉ.अमोल महाजन, डॉ.युवराज चोपडे, डॉ. दीपक चौधरी, डॉ.दाऊद खान, डॉ.मनोहर महाजन, डॉ.हरीष महाजन, डॉ.चंद्रकांत चौधरी आदी उपस्थित होते. निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यावल, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यावल, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना माहितीस्तव दिल्या आहेत.