वरणगाव : प्रतिनिधी
वेल्हाळे गावालगतच्या स्मशानभूमीत गावातील दोन महिला व एक पुरुष अघोरी कृत्य करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. मात्र, त्याची भणक लागताच अघोरी कृत्य करणारे जोडपे, मांत्रिक महिलेने घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकाराची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. अघोरी कृत्याचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे रविवारी, २० रोजी स्व.शांताबाई आत्माराम पाटील (वय ९२) यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर गावालगतच्या स्मशानभूमीत सांयकाळी अंत्यविधी पार पडला. रात्री ८.३० वा गावातील काही शेतकरी शेती पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातीलच एक पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन करताना पाहिले. स्मशानातील अघोरी कृत्याचा प्रकार पाहून शेतकऱ्यांनी गावाच्या दिशेने धाव घेतली व गावातील नागरिकांना याची कल्पना दिली. यामुळे अघोरी कृत्याची शहानिशा करण्यासाठी गावातील नागरिकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. त्याची भणक त्रिकुटाला लागताच त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेमुळे ग्रामस्थांसह लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मांत्रिक कशासाठी हवन करत होते? याबद्दल परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
विज्ञानातून देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. येथील नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत आहे. या प्रकाराबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन गावात प्रबोधने करून जनजागृती निर्माण करावी. लवकरात लवकर या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.