वरणगाव : प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यालयात शिल्लक साठ्यातील शालेय पोषण आहार खराब अवस्थेत असल्याचे पोषण आहार अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आल्याने त्याचा पंचनामा केला आहे. मात्र, खराब व मुदतबाह्य झालेल्या पोषण आहाराची नोंदवहीत नोंद नसल्याचेही आढळून आल्याने याबाबत दोषींवर कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची कुजबुज सुरू आहे.
वरणगाव व शहर परिसरात नावाजलेल्या दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालयातील कार्यकारिणी मंडळाचा सत्ता संघर्षाचा वाद सर्वश्रृत आहे. हा वाद आता न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच विद्यालयातील भ्रष्ट कारभार कात्रीत पकडण्यासाठी सुरु असलेल्या धडपडीत शालेय पोषण आहाराचा मुद्दा समोर आला आहे. शाळेतील शालेय पोषण आहाराच्या प्राप्त तक्रारीवरून पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक वर्ग २ चे अजित तडवी व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पथकासह म. गां. विद्यालय गाठले. मात्र, विद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागलेले कुलुप व मुख्याध्यापिका यांना येण्यास विलंब होत असल्याच्या कारणास्तव पथक माघारी फिरलेल्या पथकाने सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यालयात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, विस्तार अधिकारी तुषार प्रधान व इतर अधिकाऱ्यांसह दाखल होवून शालेय पोषण आहाराची तपासणी केली. त्यामध्ये २४५ किलो धान्यसाठा खराब व मुदतबाह्य अवस्थेत आढळून आला. यामध्ये १५० किलो तांदूळ, ६० किलो वाटाणा खराब तर मसाला २३ व हळद १२ किलो मुदतबाह्य असल्याचा समावेश आहे. तसेच नोंदवहीत तांदूळ – ९६ .२२ कि, मसुरदाळ -६५७ कि., हरभरा -७५० कि., वाटाणा -७१९ कि., जिरे -१५.६२३, मोहरी-२६.५२३, हळद-५०.७३६, मिरची पावडर -५७.७१, गरम मसाला-५६.१५३ व तेल- ६३१.५१० असे नमूद केले आहे. प्रत्यक्ष तपासणीत तांदूळ -९९.५० कि., हरभरा-७५० कि., वाटाणा -७३० कि., मसूरदाळ -६६५ कि., गरम मसाला-५५ कि., मिरची पावडर-६३.८, हळद-३१ कि., जिरे-१० कि., मोहरी – २३ कि., तेल-६६० कि. तसेच तांदूळ-१८७ पोते पंचनाम्यात नमूद केले आहे .
तांदुळात तफावत-भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न?
पोषण आहार अधीक्षकांनी केलेल्या तपासणीत साठा नोंदवहीत तांदूळ – ९६.२२ किलो दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, गोदामात ९९.५० कि. आहे. त्यापैकी १.५० खराब दाखविण्यात आला आहे. काही प्रमाणात धान्यसाठा शिल्लक असतांना विद्यार्थी पटसंख्येनुसार पुरेपुर नवीन धान्यसाठा मागणी करण्यात आला असल्याचीही माहिती समोर येत आहे. याबाबत संस्थेचे माजी अध्यक्ष गणेश झोपे यांनी शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी यांनी सर्वांसमक्ष पंचनामा न करता शाळेच्या पर्यवेक्षक कार्यालयात बसुन धान्य साठ्याच्या नोंदवहीत खाडाखोड करून दस्ताऐवजांमध्ये फेरफार केला आहे. तसेच अधीक्षकांनी पोषण आहारातील भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
पोषण आहार रात्री तपासणीचा उद्देश काय?
शालेय पोषण आहाराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, विस्तार अधिकारी तुषार प्रधान व इतर अधिकाऱ्यांसह सोमवारी रात्री १० वाजेच्या पोषण आहार तपासणीसाठी वरणगाव गाठले. मात्र, मुख्याध्यपक न आल्याने त्यांनी धान्य साठ्याच्या गोदामाला सील न करता रिकाम्या हाताने माघारी गेले. यामुळे पोषण आहार अधीक्षकांना रात्री शाळा बंद असल्याची माहिती असतांना तपासणीसाठी येण्या मागचे कारण काय? अशा विविध कारणांनी पोषण आहार अधीक्षक अजित तडवी यांच्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे.