साईमत, नाशिक : प्रतिनिधी
महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला सध्या वास्तुदोषाने घेरले आहे. त्यामुळेच विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य न करता खासगी फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राखी पौर्णिमेच्या दिवशी चर्चेला उधाण आले.मात्र, आयुक्तांनी वृत्ताचा इन्कार केला असून, वास्तुदोष वगैरे काही नाही. बंगल्यात दुरुस्ती करावयाची असल्याने खासगी फ्लॅट घेऊन राहत असल्याचा खुलासा केला.
महापालिका आयुक्तांचा गडकरी चौकात असलेला बंगला पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. या व्ोळेची चर्चा मात्र वास्तुदोषाची आहे. यापूर्वी आयुक्तांचा बंगला विविध कारणांमुळे चर्चेला उधाण आले आहे.
कृष्णकांत घुगे आयुक्त असताना बंगल्यात चोरी झाली होती. भास्कर सानप आयुक्त असताना चोरांनी वरच्या मजल्यावर डल्ला मारला होता. अभिषेक कृष्णा आयुक्त असताना पार्टीमुळे बंगला चर्चेत आला होता. डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त असताना बंगल्यात कर्मचाऱ्यांची रात्रभर लावलेली ड्यूटी चर्चेत आली होती. तुकाराम मुंढे आयुक्त असताना शहरात अतिक्रमित बांधकामांवर हातोडा मारत होते, मात्र दुसरीकडे आयुक्त बंगल्यातच चुकीच्या पद्धतीने काम करून नगररचनेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा होती. कैलास जाधव आयुक्त असताना आयुक्त बंगल्याचे नामकरण व अव्ोळी अधिकाऱ्यांचा राबता चर्चेत आला. आता वास्तुदोषामुळे बंगला चर्चेत आला आहे. आयुक्तांच्या बंगल्यात वास्तुदोष असल्याने प्रगती होत नाही, येथे विविध प्रकारच्या कटकटींना सामोरे जाव्ो लागते, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आयुक्त येथे टिकत नाही. या कारणांमुळे विद्यमान आयुक्त डॉ. करंजकर यांनी बंगल्यात वास्तव्य करण्याचे सोडून खासगी फ्लॅटमध्ये ते वास्तव्याला गेले आहेत, अशी चर्चा दिवसभर शहरात होती. परंतु, आयुक्त करंजकर यांनी अशा चर्चांना पूर्णविराम देताना, आयुक्त बंगल्यात दुरुस्तीची कामे काढल्याने खासगी फ्लॅटमध्ये वास्तव्याला जाव्ो लागल्याचा खुलासा केला.