साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्ह्यातून हजारो राख्या पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नंदुरबारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना राखी पाठवीत ‘भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपाने ओवाळणी दे..!’ अशी साद महिला भगिनींनी घातली आहे.
कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जुन्या पेन्शनचा विषय मागील काळात चांगलाच गाजला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी नोकरदार आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला शेवटी आपली भूमिका सोडावी लागली व फॅमिली पेन्शन लागू करत जुन्या पेन्शनचा विषय सरकारने निकाली लावला. मात्र २००५ नंतर शासकीय सेव्ोत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनचा प्रश्न महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून रेटून धरला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत राख्या पाठविण्यात येणार आहेत. जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी हा अभिनव असा उपक्रम राबविला जात आहे. सुमारे चार लाख कर्मचारी २००५ नंतर सरकारी सेव्ोत रुजू झाले आहेत, तरीदेखील १९८२-१९८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून २००५ नंतर डीसीपीएस व एनपीएस नावाची अन्यायकारक अशी योजना सुरू करण्यात आली आहे.जोपर्यंत जुनी पेन्शन योजना सरसकट लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने घेतलेला आहे. सेव्ोत असलेल्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या पत्नी अथवा मुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने राख्या पाठविणार आहेत.बहीण भावाला ओवाळते तेव्हा भाऊ काहीतरी भेट देत असतो. मुख्यमंत्र्यांच्या रूपातील भावाकडून जुनी पेन्शनची ओवाळणी देण्याची घाट जिल्हाभरातील भगिनींनी केलेला आहे. २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी शासनाचे लक्ष व्ोधण्याचा संघटनेमार्फत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे.