साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसगाव टाकळी परिसरातील शेतकरी नानाजी हनुमंत सोनवणे शेतीला पुरेशी वीज मिळत नसल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अशीच अवस्था शिरजगाव सबस्टेशनवर अवलंबून असलेले टाकळी ताळोंदा, देशमुखवाडी, आलूवाडी आणि शिरसगाव अशा अनेक गावात शेतकरी आणि ग्रामस्थांची झाली आहे. सतत ट्रिप होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यंदा पावसाने एक महिन्यापेक्षा अधिकची उघडीप दिली. कोरडवाहू शेती पीक मातीमोल झाली आहे. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी आहेत. त्या विहिरींनी तळ गाठला आहे. ठिबक, तुषारसिंचन करून पीक जगविली जात आहेत. पण त्यासाठी सलग वीज मिळत नाही. सलग पाच तास वीज देणे बंधनकारक आहे. वीज येते ट्रिप होते, बंद पडते. पुन्हा येते, पुन्हा बंद होते. ग्रामीण भागात वीज कर्मचारी म्हणतात, सबस्टेशन लोड घेत नाही. चाळीसगावहून बंद केली. अशी उत्तरे त्यांच्याकडून ठरलेली आहेत.
तालुक्यात लोकसंख्या वाढली, विहिरींची संख्या वाढली, सिंचन वाढले या सर्वांमुळे घरगुती व्यापारी आणि कृषी या तिन्ही क्षेत्रात विजेचा वापर वाढला आहे. पण वीज पुरवठा व्यवस्था जुन्याच आहेत. त्यावर ताण वाढणारच आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी सबस्टेशन आणि ट्रान्सफार्मरची मागणी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत विजेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पायाभूत सुविधांसाठी एक वैचारिक बैठक हवी आहे.
यंदा निसर्गाने तर मारले आहे. सुलतानी संकट त्यापेक्षा विदारक आहे. राजकारण, पक्ष, पळवा पळवी, व्यापार हे होतच राहणार. पण ज्या मतदारांवर ही लोकशाही व्यवस्था टिकून आहे, तोपण जगला पाहिजे. हीच माफक अपेक्षा आहे. अशा गंभीर समस्येकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे.