साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
भाऊ आणि बहिणींमधील रक्षाबंधन हा पवित्र बंध साजरा करणारा सण आहे. जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन बुधवारी, ३० ऑगस्टला आहे. बहुतेक वेळा असे घडते की, रक्षाबंधनावर भद्रा काळाचा परिणाम होतो आणि भाऊ-बहिणीच्या सणात अडचण येते. यावेळीही रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्यासारखे आहे. तिथी आणि भद्राच्या फेरफारामुळे यावेळीही रक्षाबंधन २ दिवस साजरे केले जाणार आहे. म्हणजेच ३० आणि ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. भद्राकाळामुळे रात्री बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील.
बाहेरगावी असणाऱ्या भावाला राखी पाठविण्यासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग दिसून येत आहे. राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाही तर शुभऐवजी अशुभ फळ मिळेल, असे ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात. फॅशनची राखी घेताना अशुभ गोष्टींची खरेदी करु नका. काळ्या धाग्याची किंवा काळ्या रंगाची राखी कधीही घेऊ नका. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक असते. लहान मुलांसाठी कार्टूनची राखी बाजारात मिळते. अशा राख्या अजिबात खरेदी करु नका. या राख्यांवर कधी-कधी क्रॉस, हाफ वर्तुळ असतात. ते अशुभ मानले जाते. त्याचा परिणाम भावाच्या आयुष्यावर होतो. राख्या घेताना त्यावर बनविलेल्या चिन्ह बघून त्याची खरेदी करा.
देवी-देवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नका
प्रतिमा रक्षासूत्र म्हणजेच मॉली ही सर्वात शुद्ध आणि पवित्र राखी असते. यासोबतच फुले आणि मोत्यांनी बनविलेली राखी भावासाठी शुभ असते. भावाच्या मनगटावर देवी-देवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नये. अनेकवेळा राखी तुटून पडते किंवा नकळत घाणेरडे हात असतात. अशावेळी देवांचा अपमान होतो. राखी घेताना त्या तुटलेल्या किंवा त्या बांधताना तुटतील अशा घेऊ नयेत. कारण त्या अशुभ असतात. तुमच्या घरात जुनी राखी पडली असेल तर ती फेकून देऊ नका. ती वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित करा. मिठाईमध्येही काळा आणि तपकिरी रंग टाळावा. चॉकलेटसोबतच लाडू, दूध बर्फी, केशर बर्फी, स्पंज, रसमलाई यासारखे गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता.