मुंबई ः प्रतिनिधी
अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत, असे चॅलेंज राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका कार्यक्रमात केले होते. तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले नऊही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परततील असा दावाही त्यांनी केला होता. यावर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. २०२४ नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय होईल. जागा वाटप या समन्वयाने होईल. त्यानंतर जो काही निकाल येईल, त्यानंतर केंद्रीय संसदीय मंडळ जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“५१ टक्के लोक मोदींच्या बाजूला आहेत.अजितदादांनी चांगला निर्णय घेतला.राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांनी आतापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयापेक्षा हा निर्णय चांगला घेतला की, ते मोदींसोबत आले. जीवनात मुख्यमंत्री होतील की नाही हे अंतिम नसते, पण हे खरे आहे की, अजितदादांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे, असेही ते पुढे म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसांसारख्या अष्टपैलू नेतृत्त्वाबद्दल, ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या मनात जी उंची गाठलीय, ती उंची कधीच कमी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरेनांही ही संधी मिळाली होती परंतु त्यांनी ज्या पद्धतीने अडीच वर्षे सरकार चालवले, देवेंद्र यांच्यासारखी उंची ते गाठू शकले नाहीत.त्यामुळे गलिच्छ भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टीका करून राहिलेली उंचीही कमी करत आहेत. उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीत आले आहेत की, सभेतून अशा पद्धतीने टीका करत आहेत, याचे उत्तर जनता देईल”, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबईत मोठा उद्रेक होईल
“१३ कोटी जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीसांबद्दल आदर आहे. जितका अपमान कराल तितके त्यांचे नेतृत्त्व मोठं होत जाते.देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावासारखे सांभाळले.उद्धव ठाकरेंना रोज माणसे सोडून जात आहेत. बावचळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीत ठाकरे आले आहेत. याविरोधात इतका मोठा उद्रेक होईल की, मुंबईत याचे पडसाद उमटतील. ते आम्ही रोखू शकणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.