साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
रिक्षातून जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या पिशवीतून चांदीचे देव चोरुन पसार झालेल्या दोन महिलांना रिक्षा चालकाच्या सतर्कतेने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्या महिलांकडून चोरी केलेले चांदीचे देव पोलिसांनी हस्तगत करत दोन्ही महिलांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर असे की, नवीन चांदीचे देव बनविण्यासाठी आशा प्रभाकर जाधव (वय ६८, रा. दत्त कॉलनी, पाचोरा) ह्या सराफ दुकानात गेल्या होत्या. त्या देव बनवुन झाल्यानंतर रिक्षातून जाण्यासाठी निघाल्या. रिक्षात दोन महिला बसल्या होत्या. आशा जाधव ह्या महाराणा प्रताप चौकात रिक्षातून उतरुन घरी गेल्यावर त्यांना पिशवीत चांदीचे देव आढळून आले नाही. आशा जाधव यांनी लागलीच रिक्षा चालकास फोन करुन प्रकार सांगितला. त्यानंतर रिक्षा चालकाने शहरात त्या दोन महिलांचा शोध घेत असतांना संबंधित दोन्ही महिला रेल्वे स्थानकावरील मार धयावर आढळून आल्या. त्यावेळी रिक्षा चालकाने पोलिसांना खबर दिली.
तपासणी केल्यावर उर्वरित चांदीचे देव आढळले
पोलिसांनी दोन्ही महिलांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर चौकशीअंती आशा जाधव यांचे चोरीस गेलेल्या १० चांदीच्या देवांपैकी २ देव महिलांकडून हस्तगत केल्यानंतर इतर देवांची विचारपूस केली. तेव्हा शहरात एका ठिकाणी ते फेकले असल्याचे महिलांनी सांगितले. त्याठिकाणी जावून तपासणी केल्यावर उर्वरित चांदीचे देव आढळून आले. ज्योती सोनु साकेरा आणि भुमी सोनु साकेरा (रा. चाळीसगाव) असे त्या दोन महिलांचे नाव आहे. त्यांच्याविरुध्द पाचोरा पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे करीत आहे.
