साईमत, चोपडा : प्रतिनिधी
जे समाजाचे हित पाहते ते साहित्य, ही संत विनोबाजींची साहित्याची व्याख्या पूर्णपणे प्रत्ययकारी आहे. साहित्य समाजात स्नेह, वात्सल्य निर्माण करते. अमळनेरात होऊ घातलेले साहित्य संमेलन खान्देशसाठी मोठी पर्वणी ठरणारे आहे. हे संमेलन फक्त अमळनेरचे नसून खान्देश यांचे आहे. संमेलनात सर्वांनी तन-मन आणि धन देत सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात सहविचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अमळनेरच्या मराठी वाडःमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष कवी रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, म.सा.प.चे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह संजय बारी, नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुळकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, अ.भा.सा.प.चे अध्यक्ष अशोक सोमाणी, सचिव प्रभाकर महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया उपस्थित होते.
योगदानासाठी स्वत: पुढाकार घेऊन सहभागी व्हावे
अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बाल साहित्य संमेलन होणार आहे. तसेच या ३ दिवसीय साहित्य संमेलनात स्थानिक साहित्यिकांना अधिकाधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. खान्देशातील साहित्यिकांबाबत माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असतील. आपण साहित्य महामंडळाकडे आवश्यक त्या सूचना करुन योग्य तो बदल करु इच्छित आहोत. संमेलनानिमित्त गठित होणाऱ्या विविध ३५ समितीत योगदानासाठी स्वत: पुढाकार घेऊन सहभागी व्हावे. अभिरुप न्यायालय, परिसंवादात विनोदी तसेच विज्ञाननिष्ठ विषय घेण्याचा विचार करीत आहोत असे सांगत त्यांनी सर्वांना तन-मन-धनाने सहभागी होण्याचे आवाहन मराठी वाड:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी केले.
देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
यावेळी कवी अशोक सोनवणे, प्रा. एस. टी. कुळकर्णी यांनी उपस्थितांना सहकार्याचे आवाहन करत साहित्य संमेलनाच्या आयोजनासंबंधी सूचना मांडल्या. सभेत डॉ. विकास हरताळकर, रोटरी क्लब ऑफ चोपडा, अशोक सोमाणी, विलास पं. पाटील, एस. टी. कुलकर्णी, व्ही. एच. करोडपती, जी. टी.पाटील, किरण व. गुजराथी, गोविंद गुजराथी यांनी साहित्य संमेलनासाठी देणग्या जाहीर केल्या. या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहविचार सभेस तालुक्यातील अनेक साहित्य रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक नगर वाचन मंडळाचे अध्यक्ष आशिष गुजराथी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय संजय बारी यांनी करुन दिला. सूत्रसंचालन गोविंद गुजराथी तर आभार श्रीकांत नेवे यांनी मानले.
