साईमत, भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळगाव येथील बंद घर फोडून घरातून ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, अनिल पुंजू केदार (वय ४७, रा.कोळगाव, ता. भडगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्याचे घर बंद असताना अज्ञातांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर अनिल केदार याने भडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. ही चोरी आनंदा प्रकाश खैरे यांनी केली असल्याचा आरोपही करण्यात आला. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.
