चुकून दुसऱ्याच्या खात्यावर गेलेली ५० हजारांची रक्कम मिळाली परत

0
15

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

आपल्या बँक खात्यातून गेल्या १४ ऑगस्ट रोजी गोपाल संजय पाटील यांनी चुकून अनोळखी मोबाईल नंबरवर सुमारे ४९ हजार ८०० रूपयांची रक्कम पाठविली गेली होती. ही रक्कम बिहार येथील एका व्यक्तीच्या खात्यावर गेले होते. याबाबत त्यांनी सविस्तर तक्रार अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक उपअधीक्षक, चाळीसगाव यांच्याकडे केली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तक्रारीची त्यांचे स्तरावर दखल घेवून गोपाल पाटील यांना धीर दिला. याकामी ॲड.समीर तक्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करून व समयसूचकता तसेच आपले संभाषण कौशल्य वापरून तत्काळ बिहार पोलिसांशी संपर्क करून झाल्या प्रकाराची माहिती दिली. रक्कम ४९ हजार ८०० रूपये शकील अहमद नामक व्यक्तीला परत करण्यास भाग पाडले. ही रक्कम गोपाल पाटील यांना अवघ्या तीनच दिवसात परत मिळवून दिली. यासाठी एअरटेल पेमेट्‌‍स बँकचे क्षेत्रीय शाखाधिकारी मुकुंद सोवीतकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

सतर्कता बाळगणे गरजेचे

अशा घटना ज्यावेळी घडतात त्यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच तक्रारदारांना विश्वासात घेवून घटनेचे गांभीर्य ओळखून सखोल चौकशी करून यथायोग्य कारवाई करणे गरजेचे असते. परंतु बहुतेक वेळेस संबंधित तपास यंत्रणेच्या अनास्थेमुळे व कारवाईत झालेल्या विलंबामुळे ट्रान्सफर झालेली रक्कम परत मिळविणे अवघड होवून जाते. या घटनेतही गांभीर्याने दखल न घेता तक्रारदार गोपाल पाटील यांना स्थानिक पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देवून परतवून लावले.

योग्य कृती करणे ठरते फायद्याचे

अशा घटनांमध्ये योग्य मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरते. पोलिसांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून अशा घटना हाताळणे अपेक्षित असते. अगोदरच आपल्या कष्टाचे पैसे गेल्यावर तक्रारदार हा हतबल झालेला असतो आणि पोलिसांकडून योग्य सहकार्य न मिळाल्यास तो अजून खचून जातो. त्यातच वेळ वाया जावून ट्रान्सफर झालेल्या रकमेची विल्हेवाट लागण्यास वेळ लागत नाही. अशा घटनेस बळी पडलेल्या नागरिकांनी पूर्णपणे पोलिसांवर अवलंबून न राहता आपली बँक व कायदेतज्ज्ञ यांच्याशी त्वरित संपर्क साधून योग्य कृती करणे फायद्याचे ठरते, असे ॲड. समिर तक्ते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here